Bridge Construction । नितीन भटारकरांच्या पाठपुराव्याला यश! भटाडी, किटाडीसह ६ गावांसाठी आनंदाची बातमी.

March 15, 2026 by Prakash Hande

Bridge Construction Project : चंद्रपूर:- तहसील जिल्हा चंद्रपूर येथील भटाडी या गावाला जोडणार्या प्रमुख रस्त्यावर पुल बांधकामाचा कंत्राट जवळपास ६ वर्षाअगोदर कंत्राटी पद्धतीने देण्यात आला होता. परंतु ६ वर्षे लोटूनही पुल बांधकामात गलथान कारभार करणाऱ्या कंपनीने जवळपास ६ कोटी रुपये घेऊनही फक्त सहाच खांब बांधले होते. सदर पुलावर आजपर्यंत जवळपास १० हुन अधिक नागरीकांचा जिव गेलेला आहे व म्हणून या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करीत पुलाचे बांधकाम तात्काळ सुरु करावे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आजपर्यंत सतत पाठपुरावा केला. (चंद्रपुरात स्त्री शक्तीचा जागर)

 

त्याअनुषंगाने सा.बां.वि.क्र.१ व्दारे दिनांक ०१/०७/२०२३ पासून ते बांधकाम सुरु होण्यापर्यंतच्या दिवसापर्यंत प्रति दिवस ५०००/- रुपये याप्रमाणे पुल बांधकाम करणाऱ्या कंपनीवर दंड आकारण्यात आले असल्याचे तसेच सदर पुलाचे बांधकाम नव्याने सुरु करण्याकरिता सुप्रमा आवश्यक असल्याचे मा. कार्यकारी अभियंता. सा.बां.वि.क्र.१ चंद्रपूर यांनी नितीन भटारकर यांना लेखी पत्र दिले होते. त्याअनुषंगाने या पुलाच्या बांधकामा करिता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला होता.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी या पुलाचे महत्व व परिसरातील जवळपास ६ गावातील नागरिकांची होणारी गैरसोय राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी दिनांक ०९ ऑक्टोंबर २०२६ रोजी स्वतः मंत्री इंद्रनील नाईक यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष या पूल बांधकामाची माहिती घेत गावकऱ्यांशी चर्चा केली व नागरिकांची गैरसोय लक्ष्यात येताच सदर पूल बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व प्रक्रियेकडे यापुढे स्वतः लक्ष देणार असल्याची ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली होती.

 

त्यालाच अनुसरून मागील निधी मध्ये वाढ झाली असल्याने सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक होती. राज्यभरातून महत्वाच्या कामांना मान्यता देण्यासंदर्भात मागील महिन्यात व्यय अग्रक्रम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत जिल्ह्यातून या एकमेव पुलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून आवश्यक असलेल्या १८ कोटी ६४ लाख ०४ हजार २७१ रुपये किमतीच्या प्रस्तावास व्यय अग्रक्रम समिती द्वारे मान्यता देण्यात आली.

 

आता या पुलाच्या बांधकामासंदर्भात पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आवश्यक कार्यवाही करून सदर पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी मंत्री श्री इंद्रनील नाईक यांनी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. Nitin Bhatarkar NCP

मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः लक्ष्य देऊन सदर भागातील नागरिकांना दिलासा दिला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व भटाडी, किटाडी, पायली, चिचोली, वडोली, कडोली या गावातील नागरिकांनी नाईक यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

+