चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली असून, जिवती तालुक्यातील पेद्दासापूर शिवारात चक्क शेतात केली जाणारी गांजाची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली आहे. जिवती पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त रीतीने ही मोहीम राबवून संबंधित शेतावर धाड टाकली. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी शेतातून तब्बल ३४ किलो २०० ग्रॅम वजनाची गांजाची जिवंत झाडे जप्त केली आहेत. (बाबुपेठचा हनुमान अडकला LCB च्या जाळ्यात)
या प्रकरणी शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या राजेंद्र रूपचंद राठोड या शेतकऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. जिवती पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व गांजाची झाडे हस्तगत केली असून, आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अटकेत असलेल्या या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या तस्करांना आळा घालणारी ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या थेट नेतृत्वात या विशेष पथकाने ही कामगिरी चोखपणे बजावली.
या धडक मोहिमेमध्ये पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे, पोलीस अंमलदार अतुल कानवटे, ज्ञानेश्वर ढोकळे, किरण वाठोरे, सुनील पवार आणि चालक पोलीस अंमलदार अशोक मुंगल यांनी अत्यंत सतर्कतेने आणि धाडसाने सहभाग नोंदवला. दुर्गम भागात चालणाऱ्या या अवैध शेतीचा पर्दाफाश केल्यामुळे जिवती पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध अमली पदार्थांची शेती व व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Leave a Comment