Earthquake in Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिलरोजी शनिवारी सायंकाळी सुमारे ४.२२ वाजता रिक्टर स्केलवर ३.४ तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या अचानक झालेल्या धक्क्यामुळे काही भागांत नागरिकांमध्ये क्षणिक भीतीचे वातावरण निर्माण झाले. (डीजे च्या तालावर नाचताना लागला धक्का, झाली हाणामारी)
प्राप्त माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र राजुरा तालुक्यातील हरदोना परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाची तीव्रता ३.४ इतकी नोंदविण्यात आली असून त्याचे निर्देशांक अक्षांश १९.७४२ उत्तर व देशांतर ७९.२४० पूर्व असे आहेत. हा भूकंप जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तेलंगणातील करीमनगर परिसरालाही या भूकंपाशी संबंधित मुख्य केंद्रबिंदू मानले जात असल्याचेही सांगितले जात आहे.
या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती सध्या समोर आलेली नाही. तरीही अचानक धक्के जाणवल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गोदावरी नदीचे पाणी जमिनीत झिरपल्याने भूगर्भातील हालचालींना चालना मिळते. त्यामुळे अशा प्रकारचे सूक्ष्म भूकंप होण्याची शक्यता वाढते.
निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी देखील या भूकंपाच्या घटनेची पुष्टी केली असून प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Comment