Journalist Attack : चंद्रपूर - अतिक्रमणाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून होळीच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकारावर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात उघडकीस आली आहे. दैनिक नवराष्ट्र निर्माण चे जिल्हा विशेष प्रतिनिधी योगेश मुऱ्हेकर यांच्यावर चार ते पाच जणांनी नशेत असताना अचानक हल्ला केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. (चंद्रपुरात भाजप महामंत्र्याची हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मुऱ्हेकर हे आपल्या घरी कुटुंबीयांसोबत असताना हल्लेखोरांनी थेट घरात घुसून त्यांच्यावर धावून जाऊन मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुऱ्हेकर काही क्षण स्तब्ध झाले; मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या परिवाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आता प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार सुद्धा सुरक्षित नाहीत का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
अतिक्रमण तक्रारीचा राग?
चार महिन्यांपूर्वी मुऱ्हेकर यांनी म्हाडाच्या जागेवर एका मटण दुकानदाराकडून करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून संबंधित मटण शॉपच्या मालकाने मुद्दाम भांडण उकरून काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुकानातील किरकोळ वाद वाढवत तो थेट घरापर्यंत नेण्यात आला आणि बाहेरून काही तरुणांना बोलावून हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. Yogesh Murhekar
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी योगेश मुऱ्हेकर यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
पत्रकार संघटनांचा निषेध
पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी होत असून, दोषींवर तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
ही घटना केवळ एका पत्रकारावरचा हल्ला नसून, सत्य मांडणाऱ्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने आणि निष्पक्ष कारवाई करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Leave a Comment