शहरात ३ दिवसांत, ग्रामीण भागात १५ दिवसांत वीज जोडणी

January 22, 2026 by Prakash Hande

Mahavitaran Online Connection : चंद्रपूर २२ जानेवारी २०२६:- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महावितरण ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) प्रभावी वापर करून वीज जोडणीची प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नियमानुसार, आता ठराविक कालमर्यादेतच नवीन वीज कनेक्शन देणे महावितरणवर बंधनकारक असणार आहे.
महावितरणाच्या कार्यपद्धतीत बदल:- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने आपल्या अंतर्गत कार्यपद्धतीत मोठे बदल केले आहेत. १ जानेवारी २०२६ पासून ही नवीन सुधारित व्यवस्था लागू करण्यात आली असून यामुळे प्रशासकीय कामात गतिमानता येईल. (तृतीयपंथीयांसाठी दिलासादायक बातमी)

अर्ज करताच मिळणार वीज कनेक्शन:- ग्राहकाने नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर त्याला कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरणा होताच महावितरणचे कर्मचारी तातडीने नवा मीटर लावून वीज पुरवठा सुरू करतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
‘त्या' ठिकाणी १० दिवसांत जोडणी:- ज्या ठिकाणी वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा (उदा. विजेचे खांब उभारणे, नवीन तारा ओढणे) उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी १० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी मात्र वरीलप्रमाणे (३,७,१५ दिवस) जलद सेवा मिळेल.

संपूर्ण यंत्रणा आता ऑनलाइन:- नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करण्यापासून ते कनेक्शन दिल्याची यंत्रणेत नोंद होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कामात पारदर्शकता येणार आहे.
कुठे आणि कसा करायचा अर्ज:- ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपवरून नवीन वीज कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नसून, सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. Mahavitaran Online Connection

कनेक्शनसाठी कुठे तीन दिवसांची मुदत?:- आयोगाच्या नियमानुसार आता खालील कालमर्यादेत कनेक्शन मिळणे अपेक्षित आहे.
महानगर :      ३ दिवसांत
शहर :           ७ दिवसांत
ग्रामीण भाग : १५ दिवसांत

अशी आहे नवीन कार्यपद्धती:- ग्राहकाने प्रथम ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे/दाखले जोडावेत.
* महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी.
*ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना मिळेल. पैसे भरताच नवा मीटर जोडून वीजपुरवठा सुरू होणार.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला:- नव्या यंत्रणेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख केली जात आहे. जर एखाद्या अर्जाला विलंब होत असेल, तर तो नेमका कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे. हे सिस्टममध्ये त्वरित समजणार आहे. त्यामुळे दिरंगाई करणाऱ्यांवर वचक बसेल.

Leave a Comment

+