ब्रम्हपुरी - शेतकऱ्याला धानाचे व एलआयसीचे पैसे खात्यात जमा झाले, त्या पैश्यातून प्लॉट घेतला, प्लॉटचे पैसे द्यायचे असल्याने बँकेतून २ लाख रुपये काढले, मात्र पैसे देण्यापूर्वीच अज्ञाताने दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून पैसे लंपास केल्याची घटना ३० एप्रिल रोजी आरमोरी रोडवर घडली. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हातात खंजर घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न)
शेतकरी ४८ वर्षीय विलास मारोती गजभिये यांना धानाचे व एलआयसीच्या पैसे बँक खात्यात जमा झाले, त्या पैश्यातून देलनवादी मध्ये प्लॉट घेतला. त्या प्लॉटचे पैसे देण्यासाठी गजभिये हे मागील ३ दिवसापासून २ लाख रुपये काढत होते. ३० एप्रिल रोजी सुद्धा गजभिये यांनी २ लाख रुपये बँक खात्यातून काढले. ते पैसे कापडी पिशवीत ठेवत त्यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवले.
४ वाजता दुचाकी क्रमांक MH३४ AW ४४७२ मधील डिक्कीत पैसे ठेवले, वाहनाचे ऑइल बदलवायचे असल्याने गजभिये दीप्ती ऑटोमोबाईल मध्ये गेले, ऑइल बदलवून झाल्यावर त्याचे पैसे देण्याकरिता काउंटरजवळ गेले, पैसे दिल्यावर ते दुचाकी वाहनाजवळ आले असता डिक्कीची बटन निघालेले होते, त्यांनी डिक्की बघितली असता त्यामधील २ लाख रुपये गायब होते.
गजभिये यांनी गॅरेज मधील उपस्थितांना याबाबत विचारले मात्र पैसे काही मिळून आले नाही, गजभिये यांचे लक्ष नसताना अज्ञाताने डिक्कीतून पैसे लंपास केले असे समजताच गजभिये यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत याबाबत फिर्याद नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
Leave a Comment