Chandrapur BJP । एप्रिल फुल! भेटीचे आश्वासन देऊन महापौर गायब; भाजप नगरसेवकांचा मनपातच ठिय्या

April 01, 2026 by Prakash Hande

Chandrapur BJP Politics : चंद्रपूर - महानगरपालिका निवडणुकीपूर्वी चंद्रपूरकरांनी भाजपात उघड गटबाजी बघितली, निवडणुकीनंतर कांग्रेसचे गटबाजी व आता पुन्हा भाजपात गटबाजीचे राजकारण सुरु झाले आहे, आता सभागृह नेता पदावरून भाजप नगरसेवकांनी महापौरांचा निषेध नोंदविला आहे. (आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भाजप मजबूत - सविता कांबळे)

 

भाजपच्या नगरसेवकांनी एकमत होऊन मनपा गटनेता शेखर शेट्टी यांची सभागृह नेता पदावर निवड करावी असा निर्णय घेत यासंदर्भात महापौर संगीता खांडेकर यांना पत्र दिले मात्र ऐनवेळी नगरसेवकांचा निर्णय फिरवत महापौरांनी जयश्री जुमडे यांची सभागृह नेते पदावर निवड झाल्याची घोषणा केली, या निर्णयामुळे मनपात राजकीय युद्ध सुरु झाले होते. आज भाजपातील सर्वात जास्त नगरसेवक आमदार किशोर जोरगेवार यांच्या बाजूला आहे. तर काही नगरसेवक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बाजूला. यामुळे आमच्या मर्जीतील नगरसेवकाला पदावर संधी मिळावी असा दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरु आहे.

 

मनपात भाजप अल्पमतात असताना सुद्धा राजकीय शत्रू शिवसेना उबाठा यांच्यासोबत युती करीत सत्ता स्थापन केली, मुनगंटीवार यांनी संगीता खांडेकर यांना महापौर पदावर बसविले. मात्र ऐनवेळी महापौर खांडेकर यांच्या भूमिकेमुळे भाजप नगरसेवक नाराज झाले आहे. माजी भाजप अध्यक्ष व नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी महापौर खांडेकर यांना सभागृह नेत्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली, त्यावर आपण यावर १ एप्रिल रोजी माझ्या दालनात बोलू असे आश्वासन दिले, सकाळी भाजप नगरसेवक मनपात दाखल झाले, सायंकाळ पर्यंत महापौर यांनी भाजप नगरसेवकांची भेट घेणं टाळल्याने नगरसेवकांनी महापौरांचा निषेध केला. एकंदरीत महापौरांनी भेटीचे आश्वासन दिले मात्र ऐनवेळी त्या न आल्याने नगरसेवकांचा एप्रिल फुल झाला असल्याची चर्चा मात्र नागरिकात रंगली आहे.

Leave a Comment

+