Ramala Lake Fish Death : चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाला तलावात २४ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात दुर्गन्धी पसरली, पर्यावरण प्रेमींना याबाबत माहिती मिळाल्यावर तलाव परिसराची पाहणी केली असता त्यामधील हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले. (मालधक्का नकोच, मूल वासियांची मागणी)
आज दुपारी रामाला तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसून आले. उन्हाळ्यामुळे तलावातील पाणीपातळी घटली असून वाढत्या तापमानामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलाव परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
माहिती मिळताच प्रदूषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाण्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी या घटनेवर संताप व्यक्त करीत या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला.
पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाने तातडीने मृत मासे हटवून तलावाची स्वच्छता करावी आणि पाण्याची गुणवत्ता तपासून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सध्या तलावातील पाणीपातळी खूपच कमी झाली आहे आणि तापमान वाढल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली असावी. त्यामुळे माशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने मृत मासे काढून टाकावेत आणि पाण्याची तपासणी करून योग्य उपाययोजना करावी.
Leave a Comment