बनावट औषधे व व्यसन वाढेल: Chandrapur Chemist Strike मागची कारणे काय?

May 20, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: औषध क्षेत्रातील वाढत्या ऑनलाईन व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि औषध व्यवसायाला प्रचंड बाधा निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारच्या 'GSR 217' व 'GSR 220' या अत्यंत जाचक नियमांच्या विरोधात चंद्रपुरात औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. या जाचक धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट जवळील गांधी पुतळा परिसरात तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो औषध विक्रेत्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. (चंद्रपुरात पुन्हा उष्णतेची लाट)

 

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला, ज्याला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो केमिस्ट सभासद, पदाधिकारी व किरकोळ तसेच घाऊक औषध विक्रेते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी ऑनलाईन औषध विक्रीच्या दुष्परिणामांवर तीव्र चिंता व्यक्त केली. इंटरनेटवरून अनियंत्रित पद्धतीने होणाऱ्या औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी मोठी तडजोड होत असून, बाजारात बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे येण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. तसेच डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) होणाऱ्या औषध पुरवठ्यामुळे तरुणाईमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली.

 

या ऑनलाईन पद्धतीमुळे पिढ्यानपिढ्या प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक पारंपरिक औषध विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे, अशा भावना व्यक्त करत आंदोलकांनी घोषणाबाजीतून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व करताना चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बंटी घाटे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला. ते म्हणाले की, औषध ही बाजारात मिळणाऱ्या इतर कोणत्याही सर्वसामान्य वस्तूंसारखी नसून ती मानवी जीवनाशी आणि आरोग्याशी थेट जोडलेली अत्यंत संवेदनशील बाब आहे. त्यामुळे औषध विक्रीच्या क्षेत्रात नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने होणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांवर शासनाने तात्काळ संपूर्ण नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सरकारने केवळ कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा न बघता देशभरातील लाखो औषध विक्रेते, फार्मासिस्ट आणि या पारंपारिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी कुटुंबांच्या हिताचा आणि भविष्याचा गांभीर्याने विचार करून हे जाचक कायदे मागे घ्यावेत.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी या बंदमध्ये आणि धरणे आंदोलनात अत्यंत शिस्तबद्ध आणि एकजुटीने सहभाग नोंदवून आपल्या संघटनेची वज्रमूठ दाखवून दिली. आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, औषध विक्रेत्यांनी आपल्या हक्कासाठी संप पुकारला असला, तरी नागरिकांची आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली होती. जिल्ह्यातील अत्यावश्यक आणि आपत्कालीन औषध सेवा सुरू ठेवण्यात आल्यामुळे हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने पार पडले. या यशस्वी आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा संघटनेने केंद्र व राज्य प्रशासनाला आपल्या मागण्यांचे आणि तीव्र असंतोषाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Leave a Comment

+