कॉपी बहाद्दरांचे धाबे दणाणले!, रसायनशास्त्राच्या पेपरला 'केमिस्ट्री' बिघडली! ३ विद्यार्थी निलंबित

February 18, 2026 by Prakash Hande

Chandrapur Flying Squad : चंद्रपूर: इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान राजोळी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने अचानक धाड टाकली. (चंद्रपुरात भीषण अपघात, एकाचा मृत्यू)

 

सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान तपासणीत तीन विद्यार्थी गैरमार्गाने कॉपी करताना आढळून आले. संबंधित तिन्ही विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या नियमांनुसार कॉपी प्रकरण नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे.

 

तपासणीदरम्यान परीक्षा केंद्रावरील देखरेखीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यामुळे केंद्रचालक व पर्यवेक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मंडळाकडे पाठविण्यात आला असून पुढील निर्णय मंडळाकडून घेतला जाणार आहे.

 

ही कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली केली असून परीक्षा प्रक्रियेत शिस्त व पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. Chandrapur Flying Squad

 

 बोर्ड परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधित विद्यार्थी व अधिकारी यांच्यावर कडक व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधीकरी पातळे यांनी सांगितले.

 

विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी परीक्षा प्रामाणिकपणे देऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास अधिक कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे.

Leave a Comment

+