Chandrapur Plot Patta Distribution : चंद्रपूर - शहरातील नागरिकांना पट्टे वाटप प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढून पात्र नागरिकांना पट्टे वितरित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना दिले. (उशिरा पर्यंत शाळा भरते, माझ्याजवळ तक्रार करा - खासदार धानोरकर)
या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, तहसीलदार विजय पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, महामंत्री रविंद्र गुरुनुले, श्याम कनकम, मनोज पाल, सविता दंडारे, तुषार सोम, बलराम डोडाणी, नामदेव डाहुले, नगरसेवक संजय कंचर्लावार, भालचंद्र दाणव, जितेश कुळमेथे, नितेश गवळी तसेच नगरसेविका सविता कांबळे, आशा देशमुख, अॅड. सारिका संदुरकर, सरला कुळसंगे, अनुजा तायडे, शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, ज्योती जीवने, महामंत्री सायली येरणे, कौसर खान आदींची उपस्थिती होती.
बैठकीत बोलताना आ. जोरगेवार यांनी ड्रोन सर्व्हे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत, ज्या नागरिकांची कागदपत्रे पूर्ण झाली आहेत त्यांना तत्काळ पट्टे वाटप प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले. तसेच या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी करावी आणि त्रुटी आढळल्यास त्या तत्काळ दुरुस्त कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याच बैठकीत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियोजनाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमृत कलश योजनेच्या संथ गतीबाबत आ. जोरगेवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
शहरातील प्रलंबित नळजोडण्यांचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. ज्या भागात नळजोडणी प्रलंबित आहे, तेथे तात्काळ जोडणी करण्यात यावी, तसेच ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, तेथे विशेष नळजोडणी करून समस्या सोडवावी, असे निर्देश देण्यात आले. महाकाली मंदिर परिसरातील घरांना तातडीने नळजोडणी देण्यावरही त्यांनी भर दिला.
याशिवाय लाड-पांगे समितीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पाच ठिकाणी भाजी मार्केट उभारण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. या बैठकीत प्रशासनाला विविध विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Leave a Comment