Chandrapur School Time Change : चंद्रपूर : जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, 'दिशा' समितीच्या अध्यक्षा तथा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना शाळांच्या वेळेत तातडीने बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारच्या सुमारास वाढणाऱ्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना होणारा शारीरिक त्रास आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी शाळांची वेळ सकाळी ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी या बैठकीत लावून धरली होती. (महिला आरक्षणाच्या आडून भाजपचा निवडणूक इव्हेन्ट - खासदार धानोरकर)
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या लोकहितकारी सूचनेची जिल्हा प्रशासनाने तत्परतेने दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खासदारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात तात्काळ आदेश लागू करून सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ११ वाजेपर्यंत निश्चित केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, रणरणत्या उन्हात दुपारी घरी जाण्याच्या त्रासातून त्यांची सुटका झाली आहे. प्रशासनाच्या या जलद निर्णयाचे पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढले असले तरी, काही खासगी शाळा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करून अद्यापही दुपारी उशिरापर्यंत शाळा सुरू ठेवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कडक पवित्रा घेतला असून, सर्व खासगी शिक्षण संस्थांनी प्रशासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही संस्थेची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शेवटी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्यातील पालकांना आणि जागरूक नागरिकांना आवाहन केले आहे की, जर जिल्ह्यातील कोणतीही खासगी किंवा विनाअनुदानित शाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन करत असेल, तर त्यांनी अजिबात न डगमगता त्याबाबतची माहिती किंवा तक्रार थेट खासदार कार्यालयात नोंदवावी. तक्रार प्राप्त होताच संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही देखील खासदार प्रतिभा धानोरकर महोदयांनी दिली आहे.
Leave a Comment