Engineering Student | विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअपची क्रेझ! RCERT कॉलेजचा हा नवा उपक्रम वाचून तुम्हीही थक्क व्हाल

April 12, 2026 by Prakash Hande

Engineering Student Startups : चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी ‘सेंटर ऑफ इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ या केंद्राला शैक्षणिक भेट देत नवोपक्रम आणि उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेले हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना विकसित करण्याचे आणि त्यांना उद्योग क्षेत्राशी जोडण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. (चंद्रपुरात प्रथमच सोलर हायमास्ट लाईट, आमदार अडबाले यांच्या हस्ते उदघाटन)



महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, नवोपक्रमाला चालना देणे आणि स्टार्टअप संस्कृतीबद्दल जागरूकता वाढवणे हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता. सिव्हिल अभियांत्रिकी, संगणक विज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन विभागातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी या भेटीत सक्रिय सहभाग नोंदविला.



विद्यार्थ्यांसोबत प्रा. चेतन कारेकर, प्रा. सचिन ढवस आणि प्रा. अंकित सुर्तेकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. केंद्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना नवकल्पना कशा प्रकारे संकल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होतात, त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच स्टार्टअप उभारणीतील टप्पे याबाबत सविस्तर माहिती दिली. व्यवसाय मॉडेलची उभारणी, निधी उभारणीच्या संधी, बाजारपेठेतील स्पर्धा आणि उद्योग क्षेत्रातील बदलते ट्रेंड याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.



यावेळी विद्यार्थ्यांना इन्क्युबेशन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. नवकल्पनांना आवश्यक असलेले तांत्रिक मार्गदर्शन, संसाधने आणि उद्योग क्षेत्राशी जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक समज विकसित करण्यास मदत झाली. Professional Skill Training

इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलच्या अध्यक्षा डॉ. अंजुम कुरेशी तसेच समिती सदस्य डॉ. प्रवीण मत्ते ,  प्रा. योगेश येनारकर, डॉ. पियाली चक्रवर्ती आणि डॉ. प्रशांत असुतकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.

या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व उद्योजकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून, भविष्यात स्वतःचे स्टार्टअप उभारण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून ते स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.    

Leave a Comment

+