तुमच्या घराच्या छतावरून दिसेल का चंद्रग्रहण? प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितली निरीक्षणाची सोपी पद्धत

February 27, 2026 by Prakash Hande

Lunar Eclipse 2026 : चंद्रपूर -  यंदा जगभरात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी केवळ एकच चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. या ग्रहणाबाबतची माहिती स्काय वॉच ग्रुप, महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. (माणिकगड सिमेंट कंपनीवर कारवाई करा - आमदार सुधाकर अडबाले)

 

ग्रहणाची वेळ आणि स्वरूप

भारतामध्ये दुपारी ३.२० वाजता खंडग्रास ग्रहणास सुरुवात होईल; मात्र त्या वेळी चंद्र अदृश्य असल्याने ते दिसणार नाही.

  • सायं. ४.३४ वाजता खग्रास अवस्थेला सुरुवात

  • सायं. ५.३२ वाजता खग्रास समाप्त

भारतातून अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन होईल. इतर भागांत खंडग्रास स्वरूपात ग्रहण दिसणार आहे.

 

महाराष्ट्रात किती दिसेल?

चंद्र उगवताना विविध शहरांमध्ये ग्रहणाची टक्केवारी वेगवेगळी असेल—

  • कोलकाता – सुमारे ९०%

  • गडचिरोली – ३०%

  • चंद्रपूर, नागपूर – २५%

  • पुणे – १०%

  • मुंबई – उंचीवर केवळ १%

विदर्भात सायं. ६.१८ ते ७.३३ या वेळेत अल्प स्वरूपातील ग्रहण पाहता येईल. महाराष्ट्रातून हे ग्रहण साधारण १ तास ३५ मिनिटे दिसेल.

 

इतर देशांतही दर्शन

हे चंद्रग्रहण पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत तसेच पूर्वेकडील ऑस्ट्रेलिया, आशियातील काही भाग आणि अमेरिकेतही दिसणार आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारी रोजी जगातील काही भागांत कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. पुढे १२ ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण आणि २८ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. March 3 Eclipse

 

निरीक्षणासाठी सूचना 

हे ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्याने दृश्य फार आकर्षक नसेल. घराच्या छतावरून किंवा टेकडीवरून पाहिल्यास थोडे चांगले दर्शन होऊ शकते. दुर्बिणीतून विशेष फरक जाणवत नसल्याने साध्या डोळ्यांनी निरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल.

ग्रहणे या वैज्ञानिक घटना असल्याने त्यांचा अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास आणि निरीक्षण करावे, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

Leave a Comment

+