Marriage Celebration Tragedy : चंद्रपूर - जिल्ह्यातील नागभीड येथे एका आनंदाच्या क्षणावर दुर्दैवाने विरजण पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भावाच्या लग्नासाठी आनंदाने माहेरी आलेल्या बहिणीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने काही क्षणांपूर्वी आनंदाने भरलेले घर अचानक शोकमग्न झाले. (अम्मा कि पढाई चे १३ विद्यार्थी पोलीस दलात सामील)
स्नेहा विशाल वरभे (वय ३८, रा. भद्रावती) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ अक्षय बाबुराव कायरकर याच्या लग्नासाठी ती मोठ्या उत्साहात भद्रावतीहून नागभीड येथे आली होती. रविवारी ब्रह्मपुरी येथे लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर सोमवारी नागभीड येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. घरात लग्नानंतर आनंदाचे वातावरण होते आणि स्वागत समारंभाच्या तयारीसाठी सर्वजण गडबडीत होते. स्नेहाही आनंदाने या तयारीत सहभागी झाली होती.
दरम्यान, घराच्या गल्लीत काही काम करत असताना तिचा हात चुकून विद्युत वायरला लागला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने ती तत्काळ जमिनीवर कोसळली. ही घटना इतक्या अचानक घडली की उपस्थित नातेवाइकांना काही क्षण काहीच सुचले नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
उपचार सुरू असतानाच स्नेहाचा मृत्यू झाला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वेळापूर्वी लग्नाच्या आनंदात न्हाऊन निघालेले घर अचानक शोकसागरात बुडाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून सावध राहण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.
Leave a Comment