नागभीड (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून २० दिवसानंतर वाघाच्या हल्ल्याने जिल्हा हादरला असून जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. वर्ष २०२६ मधील हि १५ वि घटना आहे. मृत महिलेचे नाव ५५ वर्षीय वनिता शंकर उईके आहे. (दुचाकीची पूजा करताना वाघाचा हल्ला)
नागभीड तालुक्यातील मौजा किटाळी मेंढा मधील काही महिला गावाजवळील जंगलात कक्ष क्रमांक 69 मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या, तेंदूपत्ता संकलन करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला केला, महिलांनी आरडाओरडा केला असता वाघाने उईके यांना फरफटत जंगलाच्या दिशेने नेले, गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळाली, वनविभागाची चमू घटनस्थळी दाखल झाली, महिलेचा जंगलात शोध घेण्यात आला असता काही अंतरावर छिन्नविछिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नागभीड पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
मृतदेहाचा पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले, घटनेनंतर गावकऱ्यांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली. वर्ष २०२६ मध्ये मानव वन्यजीव संघर्षात एकूण १५ नागरिकांचा बळी गेला, ज्यामध्ये एकाचा बिबट्याच्या हल्ल्यात तर १४ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
1 Comments
Mahesh mangam