Chimur Tiger Attack । दुचाकीची पूजा करताना वाघाचा हल्ला, आतापर्यन्त १४ नागरिकांचा बळी

April 26, 2026 by Prakash Hande

Chimur Tiger Attack : चिमूर : तालुक्यातील वाहनगाव शिवारामध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात एका ४८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शंकर दादाजी मसराम (४८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी घडलेली ही थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (मोहफुले वेचत असताना वाघाने जबड्यात पकडले)

 

नेमकी घटना काय?

मूळचे वाहनगावचे रहिवासी असलेले शंकर मसराम सध्या वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे आपल्या कुटुंबासह स्थायिक झाले होते. गावात आयोजित देवी-देवतांच्या कार्यक्रमासाठी ते गुरुवारी सकाळी वाहनगावला आले होते. त्यांनी नुकतीच एक नवीन दुचाकी खरेदी केली होती. या वाहनाची पूजा करण्यासाठी ते शेतशिवारातील नाल्याशेजारी असलेल्या मोहाच्या झाडाखाली गेले होते.

यावेळी नाल्यात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या भीषण हल्ल्यात शंकर मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.

 

असा लागला मृतदेहाचा शोध

शंकर मसराम गुरुवारी घरी न परतल्याने काळजीत पडलेल्या त्यांच्या पत्नीने वरोरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. शुक्रवारी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी वाहनगाव परिसरात शोधमोहीम राबवली. शोध घेत असताना स्मशानभूमीजवळील नाल्याच्या काठावर त्यांचा दुपट्टा आणि चष्मा मिळून आला. तिथून काही अंतरावरच त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

 

वन विभागाची कारवाई आणि मदत

घटनेची माहिती मिळताच खडसंगी (बफर) क्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. Human Wildlife Conflict

 

शासकीय नियमांनुसार, मृतकाच्या पत्नी संगीता मसराम यांना तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक एस. एस. डुबे, सरपंच प्रशांत कोल्हे आणि वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. उर्वरित नुकसान भरपाई लवकरच देण्याचे आश्वासन वन विभागाने दिले आहे.

सतर्कतेचे आवाहन:

"परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांनी एकटे जंगलात जाणे टाळावे. पूजा किंवा इतर कामांसाठी जंगल परिसरात जाताना वनविभागाला पूर्वसूचना द्यावी," असे आवाहन सहायक वनसंरक्षक एस. एस. डुबे यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात १३ आणि बिबट्याच्या हल्ल्यात १ अशा एकूण १४ जणांचा बळी गेला आहे. या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीती व्यक्त होत आहे.


Leave a Comment

+