Pratibha Dhanorkar WCL News : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील लोहाडोंगरी येथील प्रस्तावित खाण प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान आणि वेकोलीच्या विविध क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांची भेट घेतली. लोहाडोंगरी हा परिसर महत्त्वाचा व्याघ्र भ्रमणमार्ग असल्याने, येथे खाणकाम सुरू झाल्यास वन्यजीव अधिवासाचा नाश होईल आणि मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होईल, अशी भीती व्यक्त करत हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. (चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या समस्या सुटणार)
या भेटीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलीच्या वणी, बल्लारपूर, माजरी आणि वणी-नॉर्थ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. पवन खाण, विरूर-गाडेगाव, पैनगंगा, निलजई यांसारख्या अनेक खाणींसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत; मात्र, तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची उर्वरित जमीन अद्याप वेकोलीने ताब्यात घेतलेली नाही. या जमिनीवर शेती करणे आता अशक्य झाले असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
वेकोलीने खाणींतील मातीचे ढिगारे शेतशिवाराजवळ टाकल्याने आणि शेतात जाण्याचे रस्ते बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी नदीचे नैसर्गिक प्रवाह बदलल्याने शेती करणे कठीण झाले आहे. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेकोलीचे अध्यक्ष आणि सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी तातडीने एक संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकहितकारी मागणीची दखल घेत केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. "पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही आपली प्राथमिकता आहे," असा विश्वास यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या पाठपुराव्यामुळे जिल्हयातील शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Comment