Rajendra Pawar Director MSEDCL : चंद्रपूर: वीजग्राहकांवर महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना दर्जेदार व उत्कृष्ट सेवा देणे हे आपले आद्यकर्तव्य् आहे. सोबतच महावितरणचे अस्तित्व बळकट करण्यासाठी महसूल वाढ व वीजबिलांच्या शून्य थकबाकीला प्राधान्य द्यावे असे निर्देश संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिले. (चंद्रपुरात महापौर पदासाठी १० नामांकन दाखल)
गडचिरोली येथील सामाजिक न्याय भवनात गुरूवारी (दि. ५) संचालक श्री. पवार यांनी चंद्रपूर परिमंडलातील विविध कामांचा व योजनांचा उपविभागस्तरावर आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता हरिश गजबे, अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर (गडचिरोली), संध्या चिवंडे (चंद्रपूर), रमेश सानप (इन्फ्रा) यांच्यासह मानव संसाधन, लेखा विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंते व उपविभागप्रमुख अभियंते आदी उपस्थिती होते.
संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, कोणत्याही सेवा क्षेत्रात कृती मानकांनुसार निश्चित कालावधीत सेवा मिळाली तरच ग्राहकांचे समाधान होते. त्यामुळे अशी तत्पर सेवा देण्यासोबतच अचूक बिलींगसह विविध उपाययोजनांमधून महावितरणचा महसूल आणखी वाढवणे व वीजबिलांची थकबाकी शून्य करणे यास प्राधान्य देत दैनंदिन कामकाज गतिमान करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी विविध योजनांच्या प्रगतीवरील कामांचा आढावा घेतला व अंमलबजावणीला आणखी वेग देण्याचे निर्देश दिले.
आयएसओ मानांकन प्राप्त नागभीड ३३/११ केव्ही उपकेंद्राची संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी तांत्रिक व प्रशासकीय पाहणी केली व समाधान व्यक्त केले. महावितरणचे कर्मचारी किंवा नागरिकांचे विद्युत सुरक्षेबाबत विविध उपक्रमांतून सातत्याने प्रबोधन करावे. उपकेंद्र अंतर्गत तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित अभियंते व जनमित्रांनी विद्युत सुरक्षेचे पालन करण्याची सामूहिक शपथ घेतली. Rajendra Pawar Director MSEDCL
दोन नवीन शाखा कार्यालय कार्यान्वित – ब्रम्हपुरी उपविभागात नव्यानेच मंजूर झालेले किन्ही व ब्रम्हपुरी ग्रामीण १ शाखा कार्यालये ग्राहकसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आले. यावेळी संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी कार्यालयांची पाहणी केली आणि अभियंते व जनमित्रांशी संवाद साधत उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्याची सूचना केली. यासोबतच गडचिरोली मंडलासाठी स्वतंत्र वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाच्या (सीजीआरएफ) कार्यालयाचे संचालक श्री. पवार यांच्याहस्ते उद्घाटन झाले.
Leave a Comment