Record Heat in Chandrapur : चंद्रपूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी वसूमना पंत यांना निवेदन देत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी महामात्री सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, सायली येरणे, रिमा सिंग यांची उपस्थिती होती. (चंद्रपूर मनपा सभापती निवडणुकीत भाजप गोंधळली)
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्माघाताच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लहान मुलांना या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत असून, शाळेत ये-जा करताना त्यांना उष्माघात, चक्कर येणे आणि निर्जलीकरण यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महिला आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ प्रभावाने संपूर्ण सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच, इयत्ता सहावी व त्यापुढील वर्गांसाठी दुपारच्या सत्रातील शाळा पूर्णपणे बंद करून केवळ सकाळच्या सत्रातच वर्ग भरवावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे. शाळेची वेळ सकाळी ७. ३० ते १० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागणार नाही, असेही निवेदनात नमूद आहे.
चंद्रपूरमधील सध्याच्या भीषण उष्णतेचा विचार करता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवश्यक आदेश जारी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
Leave a Comment