Tadoba Safari । आमदारांनीच तोडले ताडोबाचे नियम, थेट ५ हजारांचा दंड

April 04, 2026 by Prakash Hande

Tadoba Safari Rules : चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यजीव संरक्षणासाठी कडक नियम लागू असतानाही नियमभंगाची घटना समोर आली आहे. वरोरा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी बफर क्षेत्रातील ‘निमढेला’ गेटमार्गे ३० जानेवारी २०२६ रोजी सफारीदरम्यान मोबाईलचा वापर करून व्हिडिओ (रील्स) तयार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी वन विभागाने तत्काळ कारवाई करत त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. (चंद्रपुरात महिला तक्रार निवारण केंद्राची सुरुवात)

 

मात्र, या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ताडोबा प्रकल्पात कोअर आणि बफर दोन्ही क्षेत्रांमध्ये सफारीदरम्यान मोबाईल नेणे किंवा वापरणे पूर्णतः बंदी आहे. असे असताना मोबाईल वनक्षेत्रात पोहोचला कसा? प्रवेशद्वारावर पर्यटकांची काटेकोर तपासणी केली जाते, मग या प्रकरणात तपासणी झाली नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

या घटनेचा व्हिडिओ प्रत्यक्ष घटनेच्या दिवशीच समोर आला नव्हता. तब्बल दोन महिन्यांनंतर, ४ एप्रिल २०२६ रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाल्यानंतरच प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू झाली. त्यामुळे ताडोबा प्रशासनालाही माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतरच जाग आली का, अशी टीकाही केली जात आहे.

 

व्हिडिओमध्ये जीपच्या आरशात मोबाईलचे स्पष्ट प्रतिबिंब दिसत असल्याने नियमभंगाचे ठोस पुरावे समोर आले आहेत. वन विभागाच्या नियमांनुसार हे निर्बंध वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ताडोबा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला नियम समानपणे लागू आहेत आणि कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक तपासणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

+