१५ महिन्यांची वाघीण आता वनविभागाच्या ताब्यात; ताडोबाच्या शूटरने दाखवली कमाल!

February 28, 2026 by Prakash Hande

Tiger Cub Captured : तळोधी बा. (ब्रम्हपुरी) : ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली नियत क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून १५ महिन्यांच्या वाघीण बछड्याचे वारंवार दर्शन होत होते. बालापूर–येनोली रोडलगत हा बछडा नागरिकांना दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच संबंधित बछड्याने अनेक जनावरे ठार केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. (चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने केली दोघांची शिकार)

 

मानवी जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना केल्या. तळोधी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्रसहाय्यक अरविंद मने यांच्या नेतृत्वात पाच वनरक्षक व दहा मजुरांसह कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला होता. वाघीण बछड्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती शासकीय परवानगीही घेण्यात आली.

 

आज सकाळी सुमारे ११.३५ वाजता देवपायली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७१५, येनोली रोडलगत, ताडोबा येथील शूटर अजय मराठे यांनी बछड्याला भूल देऊन सुरक्षितपणे जेरबंद केले.

 

या कारवाईदरम्यान उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ अरविंद, सहाय्यक वनसंरक्षक एम. जी. गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार, पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे, क्षेत्रसहाय्यक अरविंद मने, वनरक्षक आर. यू. भरणे, पी. एम. मेकेवाड तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.

वनविभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून पुढील कार्यवाही वनविभागाकडून सुरू आहे.

Leave a Comment

+