Warora Cotton Factory Fire । वरोऱ्यात अग्निकांड! २० हजार क्विंटल कापूस जळून खाक; कोट्यवधींची हानी

April 13, 2026 by Prakash Hande

Warora Cotton Factory Fire : वरोरा -  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सोमवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली असून यात कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. मार्डा रोडवरील रवि कमल कोटेक्स जिनिंग फॅक्टरी येथे सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास फॅक्टरी परिसरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली,  त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र कापूस असल्यामुळे आगीने झपाट्याने विक्राळ रूप धारण केले. (५ शेतकऱ्यांनी केले सामूहिक विष प्राशन)

 

आग आटोक्यात आणण्यासाठी वरोरा नगर परिषद अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र आग नियंत्रणाबाहेर जात असल्याने अतिरिक्त मदतीसाठी साई वर्धा पॉवर कंपनी, जीएमआर कंपनी, वणी, भद्रावती येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स, चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी तसेच हिंगणघाट एपीएमसी येथील अग्निशमन दलांना देखील बोलावण्यात आले. सर्व अग्निशमन दलांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

 

या भीषण आगीत सुमारे २० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा कापसाच्या गाठी ट्रकमध्ये भरल्या जात होत्या. राजस्थान नोंदणी क्रमांक असलेला ट्रक (RJ-21-G-9147) परिसरातच अडकून पडला आणि आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. आगीमुळे ट्रकच्या पुढील भागालाही आग लागली होती. अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत आग नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला.

Leave a Comment

+