ताडोबात वाघांना वाचवण्यासाठी २,३६५ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, विक्रमी मोहीम

May 14, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि इतर दुर्मिळ वन्यजीवांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी वन विभागाने आता कंबर कसली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे पसरणाऱ्या रेबीज आणि कॅनाईन डिस्टेंपर सारख्या घातक आजारांचा धोका ओळखून, प्रशासनाने 'पीपल फॉर अॅनिमल्स' आणि 'वाइल्ड सीईआर' यांच्या सोबतीने व्यापक निर्बिजीकरण व लसीकरण मोहीम फत्ते केली आहे. (कोणत्या सोलर ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज लागू आहे?)

 

वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका टाळण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

वनक्षेत्राला लागून असलेल्या ९५ गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. हे कुत्री अनेकदा हरणे किंवा इतर लहान वन्यजीवांवर हल्ला करतात. या हल्ल्यातून वाचलेल्या प्राण्यांना कुत्र्यांमार्फत रेबीज किंवा डिस्टेंपरचा संसर्ग होतो, जो संपूर्ण जंगलातील परिसंस्थेसाठी घातक ठरू शकतो. हाच धोका ओळखून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक सूचनांनुसार ताडोबा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

 

शस्त्रक्रिया आणि लसीकरणाचा असा पार पडला टप्पा

या मोहिमेअंतर्गत केवळ कुत्र्यांची संख्या नियंत्रित केली जात नाही, तर त्यांचे आरोग्यही जपले जात आहे. सूर्योदयापासून जाळ्यांच्या साह्याने कुत्रे पकडून त्यांना निर्बिजीकरण केंद्रात आणले जाते. तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून त्यांची तपासणी झाल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाते. विशेष म्हणजे, आजारी कुत्री, ६ महिन्याखालील पिल्ले किंवा गर्भवती माद्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर पूर्ण उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी सोडले जात आहे.

 

काय आहेत मोहिमेचे निष्कर्ष?

२०२५-२६ या वर्षात ताडोबा प्रशासनाने विक्रमी कामगिरी केली आहे:

  • एकूण २,३६५ कुत्र्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले.

  • यात 'पीपल फॉर अॅनिमल्स, वर्धा' यांनी १,९४५ तर 'वाइल्ड सीईआर'ने ४२० कुत्र्यांवर प्रक्रिया पूर्ण केली.

  • रेबीजसह कॅनाईन डिस्टेंपर, पॅरोवायरस आणि लेप्टोस्पायरा सारख्या घातक रोगांच्या लस टोचण्यात आल्या.

"भटकी कुत्री हा केवळ वन्यजीवांसाठीच नाही तर मानवी आरोग्यासाठीही चिंतेचा विषय आहे. संसर्गजन्य आजारांचा उद्रेक रोखण्यासाठी आम्ही संस्थात्मक पद्धतीने ही मोहीम राबवत आहोत. तसेच भविष्यात अशा समस्या हाताळण्यासाठी वनरक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे." — प्रभूनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प.

या मोहिमेमुळे ताडोबाच्या बफर क्षेत्रातील मानवी वस्त्या आणि जंगल यांमधील आरोग्यविषयक संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Leave a Comment

+