चंद्रपूर: शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) सतर्क झाली असून, या पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. दिनांक १३ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. (चंद्रपुरात एटीएस चे धाडसत्र, एकाची चौकशी)
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपींची ओळख पटवली. या कारवाईत उशांत देवराव कार्लेकर (वय ३६, रा. तुकूम, चंद्रपूर) आणि प्रवीण नानाजी पिंगे (वय ३६, रा. नेहरू नगर, चंद्रपूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून हिरो स्प्लेंडर प्लस (क्रमांक MH 34 BN 5442) ही दुचाकी हस्तगत केली आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ५०,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारवाईमुळे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अपराध क्रमांक ३९४/२५ कलम ३०३(२) BNS नुसार दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी स्थानिक रहिवासी असल्याने, त्यांनी आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचो,रे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, एएसआय धनराज करकाडे, पोलीस हवालदार सुरेंद्र महतो, चेतन गज्जलवार, पोलीस अंमलदार सुमित बरडे आणि अजित शेंडे यांच्या पथकाने पार पाडली.
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी आपले गस्त आणि गोपनीय माहितीचे जाळे अधिक घट्ट केले असून, या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे.
Leave a Comment