शेगाव: घरात लपवले होते ८६ हजारांचे बोगस बियाणे, कृषी विभागाची धाड

May 13, 2026 by Prakash Hande

शेगाव - खरीप हंगामाचा फायदा घेत, शेतकऱ्यांना बोगस बियाण्याची विक्री करण्याचा घाट काही प्रवृत्ती करीत आहे, असाच एक प्रकार वरोरा तालुक्यातील शेगाव बु. मध्ये उघडकीस आला. कृषी कार्यालय वरोरा मधील कृषी अधिकारी गुण नियंत्रक मारोती संतोषराव वरभे यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून धाडसत्र राबवित एकूण ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (किरकोळ वादातून वृद्धाची दगडाने ठेच हत्या)

 

१२ मे रोजी गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव मध्ये राहणारे मितेश किशोर पारोधे यांच्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी दोन पांढऱ्या पिशवीत HTBT बियाणे विक्रीच्या उद्देशाने साठवून असल्याचे आढळले.

प्लास्टिक पिशवी ज्यावर छावा लिहलेल्या बॅगमध्ये छावा हायब्रीड कपास बीज ५G काईन्ड हायब्रीड कॉटन व्हेरायटी व दुसऱ्या TRUST लिहलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये हायब्रीड कपास बीज लॉट बियाणे आढळले, या धाडीत एकूण ९६ पॉकिट हायब्रीड बियाणे असा एकूण ८६ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

सदरील अवैध बियाणे हे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील टेकाडे यांच्याकडून पुरवठा झाल्याची बाब मितेश पारोधे यांनी कबूल केली. सदर बॅगवर बियाणे उत्पादकाचे नाव नव्हते, विना परवाना कापूस बियाण्याची साठवणूक, पर्यावरण संरक्षण अधिनियम व अत्यावश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन पारोधे यांनी केल्याने त्याच्यावर शेगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

Leave a Comment

+