चिमूर: 'वनिता बिअर बार'मध्ये देहव्यापार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केली छापेमारी

May 16, 2026 by Prakash Hande

चिमूर - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील आझाद वॉर्डात बिअर बारच्या आडून चालणाऱ्या एका मोठ्या देहव्यापार रॅकेटचा चिमूर पोलिसांनी शनिवारी धाडसी छापा टाकून पर्दाफाश केला. या नियोजित कारवाईदरम्यान पोलिसांनी बार चालिका वनिता जगन रंगारी हिला ताब्यात घेतले असून, तिच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. तसेच घटनास्थळावरून १८ हजार २०० रुपयांच्या रोकडसह देहव्यापारासाठी वापरले जाणारे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. (ब्रह्मपुरी फाशी चौकात पती-पत्नीने सुरु केला देहव्यापार)

 

पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती कि, आझाद वॉर्डातील 'वनिता बिअर बार'च्या इमारतीमधील तिसऱ्या माळ्यावर लॉजसारख्या खोल्या तयार करून, बाहेरील महिलांच्या माध्यमातून देहव्यापाराचा काळा धंदा चालवला जात आहे. बार चालिका वनिता रंगारी ही ग्राहकांना महिला पुरवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायची आणि स्वतः आर्थिक नफा कमवून पीडित महिलांचे शोषण करायची.

 

या माहितीची खात्री पटवण्यासाठी चिमूर पोलिसांनी आधी गुप्तपणे तपास केला. माहितीमध्ये तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी शनिवारी एक बनावट ग्राहक (डिकॉय कस्टमर) बारमध्ये पाठवून सापळा रचला. बार चालिकेने या बनावट ग्राहकाकडून एक हजार रुपये स्वीकारले आणि त्याला वरच्या खोलीत पाठवले. व्यवहार निश्चित होताच ठरलेल्या योजनेनुसार बनावट ग्राहकाने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांना संकेताद्वारे इशारा केला. इशारा मिळताच पोलीस पथकाने तात्काळ इमारतीवर धाड टाकली.

 

या छाप्यात तिसऱ्या मजल्यावरील खोलीत बनावट ग्राहक आणि पीडित महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड आणि संबंधित साहित्य जप्त करत बार चालिका वनिता रंगारी हिला अटक केली. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, सुटका करण्यात आलेली पीडित महिला ही इतर जिल्ह्यातील असून, ती गेल्या सहा महिन्यांपासून आरोपीच्या घरात भाड्याने राहत होती; याच काळात तिला या दलदलीत ओढण्यात आले. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

या प्रकरणी आरोपी महिला चालिकेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४३(२) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा (PITA) १९५६ च्या कलम ३, ४, ५, ६ आणि ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात, चिमूरचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम, सहाय्यक फौजदार भास्कर आत्राम, पोलीस हवालदार सचिन सायंकार, पोलीस अंमलदार सचिन खामनकर, फाल्गुन पर्चाके, रोहित तुमसरे, महिला पोलीस अंमलदार आशा वाकडे आणि सुरक्षा गेडाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Comment

+