Hunger Strike Ends । WCL विरोधातील आमरण उपोषणाला तात्पुरता ब्रेक

April 28, 2026 by Prakash Hande

Hunger Strike Ends : चंद्रपूर : वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिढा अखेर लेखी आश्वासनानंतर सुटला आहे. स्थानिक युवकांना रोजगारात डावलून परप्रांतीयांना प्राधान्य दिल्याच्या आरोपांमुळे हे आंदोलन तीव्र झाले होते. ८ दिवसांपासून प्रशासन आणि वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड व्यवस्थापनाने दखल न घेतल्याने संताप वाढत गेला होता. (शासकीय रुग्णालयातील अवस्था बघून खासदार संतापल्या)

 

या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत थेट हस्तक्षेपाची मागणी केली. त्यांच्या दबावानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांनी अधिकृत पत्र काढत दिनांक ५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याचे जाहीर केले. या घडामोडींमुळे प्रशासन आणि वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड दोघांवरही दबाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

 

दरम्यान, उपोषणकर्ते रोशन हरबडे यांना अधिकाऱ्यांनी लिंबूपाणी देत आमरण उपोषण सोडवले. मात्र आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय तात्पुरता असल्याचे सांगत, बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा आक्रमक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड विरोधात आवाज उठवल्याशिवाय न्याय मिळत नाही का? असा तीव्र सवाल उपस्थित केला जात आहे. येत्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

+