मजुरांच्या डोळ्यादेखत महिलेला ओढत नेले, मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

February 28, 2026 by Prakash Hande

Mul Somnath tiger attack : मूल (चंद्रपूर) - जिल्ह्यातील मूल तालुक्यात असलेल्या सोमनाथ येथील आमटे फार्ममध्ये कापूस तोडण्यासाठी गेलेल्या मारोडा येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. सुनीता शामराव भोयर (वय ४५, रा. मारोडा) असे मृत महिलेचे नाव आहे. (३ दिवसापासून बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू)

 

सुनीता भोयर या सकाळी इतर मजुरांसह शेतात कापूस तोडण्यासाठी गेल्या होत्या.  शेताच्या कडेला असलेल्या झुडपातून अचानक वाघाने हल्ला केला. इतर मजुरांनी आरडाओरडा केल्यावर वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला; मात्र तोपर्यंत सुनीता भोयर यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

 

घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे, या घटनेसह जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५ नागरिकांचा बळी गेला असून यामध्ये ४ वाघाने तर एक बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावला आहे.

 

मृत महिलेच्या पश्चात म्हातारे आई वडील कुटुंबीय असा परिवार आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

Leave a Comment

+