सावली - सावली तालुक्यातील डोनाळा येथील राजमाता जिजाऊ भोजन मंडळाच्या महिलांसाठी आज, बुधवारची सकाळ अत्यंत घातकी ठरली. एका लग्न समारंभात जेवण वाढण्याचे काम करण्यासाठी मिनी पिकअप वाहनाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका पुरुषासह इतर २५ महिलांना किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. हा थरारक अपघात सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपरी ते डोनाळा मार्गावर घडला. अपघातातील गंभीर जखमींमध्ये लता पिपरे, प्रमिला अलाम, धृपदा गेडाम आणि विमल बोबाटे यांचा समावेश आहे. (चंद्रपुरात भीषण अपघात, २ ठार)
डोनाळा गावातील राजमाता जिजाऊ भोजन मंडळाशी जोडलेल्या २९ महिला नेहमीप्रमाणे आपल्या रोजगारासाठी एमएच ३४ बीजी ५४९२ क्रमांकाच्या पिकअप वाहनात बसून अंतरगाव येथे आयोजित लग्न समारंभाकडे निघाल्या होत्या. मात्र, डोनाळा गाव सोडल्यानंतर अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि भरधाव पिकअप थेट रस्त्याखाली जाऊन उलटले. वाहन उलटताच महिलांनी एकच टाहो फोडला. या अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील शेतांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. डोनाळा येथील उपसरपंच जितेंद्र सोनटक्के आणि उपरी गावातील ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि वाहनाखाली दबलेल्या व अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.
सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी लता पिपरे आणि प्रमिला अलाम यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, धृपदा गेडाम व विमल बोबाटे यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. या अपघातात जयश्री भुरसे, बेबी बोदलकर, जयश्री उडाण, गीता नागापूरे, शिवानी नागापूरे, वर्षा नागापूरे, नीलिमा बोबाटे, साईल शेडमाके, प्रियंसू बोबाटे, गुड्डी वासेकर, चुटकी शेडमाके, श्वेता बावणे, रोहिणी बावणे, प्रतिमा बोदलकर, सरिता कुकडे, साधना पेंदोर, गणेश उडाण व इतर दोन नागरिक जखमी झाले असून, हे सर्वजण डोनाळा येथील रहिवासी आहेत.
या भीषण अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून उपरी-डोनाळा मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून ते आता कुठे पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला 'साइड फिलिंग' म्हणजेच माती व मुरमाचा भरणा केला नाही. परिणामी, समोरून एखादे वाहन आल्यास स्वतःचे वाहन रस्त्याखाली उतरवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. डांबरी रस्ता आणि बाजूची मोकळी जमीन यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्यामुळेच चालकाचा अंदाज चुकला आणि हे वाहन उलटले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या धोकादायक रस्त्यामुळे यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. बांधकाम विभागाने कंत्राटदाराच्या या मनमानी कारभाराकडे आणि निष्काळजीपणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळेच आज हा मोठा अपघात घडून एवढ्या महिलांचे आयुष्य धोक्यात आले, असा थेट आरोप उपसरपंच जितेंद्र सोनटक्के यांनी केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
Leave a Comment