चंद्रपूर: जागतिक कीर्तीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर वार्षिक 'मचाण गणना' पार पडली. उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात वन्यप्राणी तहाण शमवण्यासाठी पाणवठ्यांकडे येतात. नेमकी हीच वेळ साधून व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव वैविध्याचा आढावा घेण्यासाठी वनविभागाने निसर्गप्रेमींच्या मदतीने ही मोहीम राबवली. या मोहिमेत कोअर आणि बफर अशा दोन्ही क्षेत्रांत मिळून एकूण ५,७६५ वन्यप्राण्यांच्या दर्शनाची नोंद झाली आहे. (आमदार जोरगेवारांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट)
यावर्षीच्या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय यंत्रणेसोबतच सामान्य नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात ९९ मचाणांवर २०१ वनकर्मचारी तैनात होते. तर बफर क्षेत्रात ६९ मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बफर क्षेत्रातील ५४ मचाणांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली होती, ज्याद्वारे २१० निसर्गप्रेमींनी या थरारक अनुभवात सहभाग नोंदवला.
प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ताडोबाच्या जंगलात शाकाहारी प्राण्यांची संख्या लक्षणीय असून ती एकूण नोंदीच्या ५३.६% (३,०८९ दर्शन) इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक दर्शन चितळ (१,७४५), सांबर (६२३) आणि गवा (५४७) यांचे झाले. ही आकडेवारी प्रकल्पातील भक्ष्यसाखळी अत्यंत मजबूत असल्याचे निदर्शक आहे.
मांसाहारी प्राण्यांची स्थिती:
व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य आकर्षण असलेल्या वाघांचे एकूण ४२ वेळा दर्शन झाले. यात कोअर क्षेत्रात १९ आणि बफर क्षेत्रात २३ वाघ दिसले. बिबट्यांचे दर्शन १३ वेळा झाले असून, त्यातील ८ नोंदी बफर क्षेत्रात झाल्या आहेत. याव्यतिरिक्त अस्वल (८०), रानकुत्रा (७४), आणि विविध प्रकारचे मांजर व सिव्हेट यांचीही नोंद करण्यात आली.
इतर प्रजाती:
जलाशायांच्या काठी पक्ष्यांचीही मोठी रेलचेल पाहायला मिळाली. एकूण ५७३ पक्ष्यांच्या नोंदी झाल्या, ज्यात ५१६ भारतीय मोरांचा समावेश आहे. तसेच रानडुक्कर, नीलगाय, भेकर आणि मगरींचे दर्शनही सहभागींना झाले.
क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोअर क्षेत्रात ३,९५२ तर बफर क्षेत्रात १,८१३ प्राण्यांची नोंद झाली. ही आकडेवारी केवळ प्राण्यांची संख्या दर्शवत नाही, तर ताडोबातील 'भक्ष्य-भक्षक' साखळीचे संतुलन आणि सुदृढ अधिवास स्पष्ट करते. या मोहिमेतून मिळालेला डेटा भविष्यातील वन्यजीव संवर्धन, अधिवास व्यवस्थापन आणि दीर्घकालीन नियोजनासाठी दिशादर्शक ठरणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात रात्रभर मचाणावरून वन्यजीवांचे हे विश्व जवळून अनुभवल्याने सहभागी निसर्गप्रेमी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.
Leave a Comment