समाजसेवेचा आदर्श: चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी जपली बांधिलकी

May 10, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने किलबिल अनाथाश्रम येथे अनाथ बालकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू आणि वंचित बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांच्यासोबत प्रेम, माया आणि आपुलकीचे क्षण व्यतीत केले. (दहावीत ५६ टक्के, कपडे वाळवताना अपघात)


या उपक्रमामध्ये प्रा. डी. बी. मेश्राम, प्रा. पी. एस. पडवेकर तथा प्रा. सी. एस. पारखी तसेच EETA बॉडी इन्चार्ज प्रा. सुयोग संघरत्न ढोके आणि प्रा. दीपाली आर. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांना दैनंदिन वापरातील आवश्यक साहित्य, खाऊ तसेच इतर जीवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात प्रदान केल्या. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते.


विद्यार्थ्यांनी मुलांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत खेळ, गप्पा आणि आनंदाचे क्षण अनुभवले. अनेक विद्यार्थ्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगत भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्यास प्रोत्साहित केले. मुलांनीही विद्यार्थ्यांसोबत आनंदाने वेळ घालवत आपुलकीची भावना व्यक्त केली.


यावेळी प्रा. डी. बी. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना समाजाप्रती जागरूक राहून गरजू आणि वंचित घटकांसाठी नेहमी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून देत त्यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे प्रबोधन केले.


आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीत समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती संवेदनशीलता जपणे ही काळाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. “प्रेम आणि माया हीच सर्वात मोठी भेट असते” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सामाजिक उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. झेड. चिताडे तसेच विद्युत विभाग प्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांचे विशेष मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. सुयोग संघरत्न ढोके आणि प्रा. दीपाली आर. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना समाजातील गरजू बालकांसाठी नेहमी संवेदनशील राहण्याचे मार्गदर्शन केले.


मानवता, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जोपासणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून विद्युत विभागाच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

+