विसापूरमध्ये एकाच रात्री २ घरफोड्या: ८४ हजारांचा मुद्देमाल चोरीला

May 10, 2026 by Prakash Hande

बल्लारपूर - तालुक्यातील विसापूर मध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे, या घटनेत एकूण ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. (बल्लारपुरात गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक. ११ किलो गांजा जप्त)

 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने नागरिक लग्नसराई, नातेवाईकांच्या भेटी घेत असतात, घराला कुलूप लावत नागरिक बाहेर गावी जात असतात मात्र कुणाची तरी नजर त्या बंद घरावर असते. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील जनरल स्टोर्स धारक ६४ वर्षीय दशरथ विठुजी तुराळे हे ८ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलासह भद्रावती मध्ये राहणाऱ्या मुलीकडे गेले होते.

 

रात्री तुराळे यांनी मुलीकडे मुक्काम केला, सकाळ होताच त्यांना शेजाऱ्यांचा फोन आला, ते म्हणाले कि तुमच्या घराच्या समोरील दाराचे कुलूप तुटले आहे, असे सांगितल्याने तुराळे लगेच विसापूरात दाखल झाले, घराच्या आत गेले असता सामान पूर्णतः अस्तव्यस्त परिस्थितीमध्ये होते. घरातील तांदळाच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने, बॅगमधील चांदीचे दागिने सह रोख रक्कम गायब होती.

 

तुराळे यांचे शेजारी बंडू तंवर यांच्या घरातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते, त्यांच्या घरातून रोख व चांदीचे दागिने सह पितळेचे भांडे कुणीतरी अज्ञाताने लंपास केले होते. या दोन्ही घरफोडीच्या घटनेत एकूण ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी कलम ३०५(a), ३३१ (३), ३३१ (४) अनव्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

Leave a Comment

+