Pombhurna Drinking Water Crisis : पोंभुर्णा (चंद्रपूर): तालुक्यातील देवाडा खुर्द येथे उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. गावातील विहिरींचे तात्काळ खोलीकरण आणि स्वच्छता करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पोंभुर्णा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नमिता बांगर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. (कांग्रेस नगरसेवकांच्या गटनोंदणी मध्ये मॅडम चे अडथळे - विजय वडेट्टीवार)
देवाडा खुर्द गावात गेल्या काही वर्षांत अनेक पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या, मात्र नियोजनाच्या अभावामुळे आणि काही योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे गावकऱ्यांची तहान भागलेली नाही. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याबद्दल मनीष राऊत यांनी प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त केला.
मनीष राऊत यांनी प्रशासनासमोर गावकऱ्यांच्या वतीने खालील मागण्या मांडल्या आहेत:
विहिरींचे पुनरुज्जीवन: ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सार्वजनिक विहिरींची साफसफाई करून त्यांचे तात्काळ खोलीकरण करावे.
सौर ऊर्जेचा वापर: विहिरींवर सोलर पॅनल आणि पाण्याच्या टाक्या बसवून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.
नवीन हॅन्डपंप: ज्या भागात टंचाई अधिक आहे, अशा ठिकाणी नवीन हॅन्डपंप बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. Pombhurna Drinking Water Crisis
प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात न केल्यास, देवाडा खुर्द येथील नागरिकांसह मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनीष राऊत यांनी दिला आहे. ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी आता गटविकास अधिकारी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Comment