Shiv Sena Chandrapur । पत्रकार ते नेत्या: गोमती पाचभाई यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

April 27, 2026 by Prakash Hande

Shiv Sena Chandrapur : चंद्रपूर - उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) राज्यभर वेगाने विस्तारत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हा महिलांचा भव्य प्रवेश पक्ष संघटनासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गोमती पाचभाई यांनी सामाजिक, राजकीय तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शेअर मार्केटसारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी महिलांसाठी प्रेरणादायी आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची संघटन बांधणी अधिक मजबूत होईल. विविध क्षेत्रातील महिलांनी घेतलेला हा प्रवेश शिवसेनेला चंद्रपूर जिल्ह्यात नवी झळाळी देणारा ठरेल, असा विश्वास शिवसेना नेत्या आ. मनीषा कायंदे त्यांनी व्यक्त केला. (शासकीय रुग्णालयातील अवस्था बघून खासदार धानोरकर संतापल्या)

 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सूचनेनुसार रविवारी चंद्रपूर येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे महिलांच्या भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हॉटेल राजवाडा पॅलेस येथे आयोजित या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार व उद्योजिका गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वात विविध क्षेत्रातील असंख्य महिलांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार मनीषा कायंदे यांनी चंद्रपूर येथे उपस्थित राहून पक्षप्रवेश सोहळा संपन्न केला.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर, युवसेना प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे,लोकसभा संपर्क प्रमुख मुकेश जीवतोडे,युवसेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर,वणी विधानसभा प्रमुख आशिष खुळसंगे,भीमराज सोनी,तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवेश घेणाऱ्या सर्व महिलांचे स्वागत आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा परिधान करून करण्यात आले.

 

प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना गोमती पाचभाई म्हणाल्या की, “राज्याचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या लोकाभिमुख आणि निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष अधिक ताकदीने कार्य करेल.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी जनतेच्या प्रश्नांची प्रभावी सोडवणूक करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी नमूद केले.


या प्रसंगी वकील, प्राध्यापक, उद्योजिका तसेच विविध क्षेत्रातील महिलांनी गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) ची महिला आघाडी अधिक सक्षम होऊन आगामी काळात संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांना संघटित करून या कार्यक्रमास यशस्वी केले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. Chandrapur Politics Today

 

 चंद्रपूर जिल्हा मध्ये पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील असून या दिवसेंदिवस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे व हा प्रवेश सोहळा नक्कीच पक्षाला बळकटी देईल-ॲड. युवराज धानोरकर, जिल्हाप्रमुख चंद्रपूर 

प्राचार्या शुभांगी आसुटकर, गीता माहुलकर, रशमी इंदूरकर,माया रायपुरे, ॲड. मृणालिनी रागीट, संघमित्रा खोब्रागडे, दिपाली रहाटे, वनिता आसुटकर,मनीषा मुत्यलवार, मेघा आक्केवार, सोनिया बोर्डीकर, सिमाताई मेश्राम,मीनाक्षी सम्रुतवार, आचल बल्की,चित्रा बेले,आरती वाघाडे, वैशाली असकर, ज्योती झोडे, मीनाक्षी वाघमारे, रोशनी आसकर, दीपाली रहाटे, जयश्री भगत, ममता डांगे, वंदना मासुरकर, हेमलता जिवणे, चोरगाव च्या सरपंच तृणाली धनरे व इतर शेकडो महिलांनी सामूहिक प्रवेश घेतला.


गोमती पाचभाई : संक्षिप्त परिचय
गोमती पाचभाई या बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांनी शिक्षण, पत्रकारिता, उद्योग व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी बी.एस्सी. (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), पीजीडीबीए (इंटरनॅशनल मार्केटिंग) तसेच एमबीए (फायनान्स) अशी उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.


व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी दैनिक भास्करमध्ये मार्केटिंग मॅनेजर तसेच अ‍ॅक्सिस बँकेत सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. सध्या त्या SEBI नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर असून ‘Infinity17 Group of Companies’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत. ‘खबरकट्टा’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या पत्रकारितेतही सक्रिय आहेत.
सामाजिक क्षेत्रात ‘ताई फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी कामगार, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अनेक प्रभावी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी उभारलेले लढे यशस्वी ठरले असून अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड-2023’ प्रदान करण्यात आला असून ‘Empowered Women – Empowered Nation’ या विशेषांकात त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Leave a Comment

+