Prashant Dange Protest : ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी–वडसा महामार्गाच्या कामातील प्रचंड दिरंगाई, संथगती व निकृष्ट दर्जामुळे ब्रह्मपुरी शहरासह परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पसरलेली बिसाई, उडणारी धूळ, मोठमोठे खड्डे व अपूर्ण कामांमुळे अपघातांची संख्या वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीविरोधात रिपब्लिकन पक्ष खोरिपा तर्फे शहराध्यक्ष प्रशांत चरणदास डांगे यांनी दि. 26 जानेवारीपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. (चंद्रपूर मनपा महापौर व उपमहापौर निवडणुकीची तारीख जाहीर)
हे आमरण उपोषण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, ब्रह्मपुरी येथे दुपारी २ वाजल्यापासून सुरू असून, मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे डांगे यांनी सांगितले. महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महामार्गासोबतच ब्रह्मपुरी–आरमोरी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तसेच भुती नाला पुलाचे काम दीर्घकाळापासून अपूर्ण असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Prashant Dange Protest
याशिवाय नगर परिषदेमार्फत केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या गटार लाईनच्या कामासाठी शहरातील पक्के रस्ते फोडण्यात आले असून, काम अर्धवट ठेवून ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. पावसाळ्यात व उन्हाळ्यात या रस्त्यांवरून जाणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीमुळे महामार्गावरून भरधाव वेगाने जड वाहने धावत असून, यामुळे अपघात वाढत आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशांत डांगे यांनी प्रशासनासमोर ठोस अटी मांडल्या असून त्या लेखी स्वरूपात मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख अटी :
ब्रह्मपुरी–वडसा महामार्गाचे रखडलेले काम ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.
ब्रह्मपुरी–आरमोरी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करून जलदगतीने पूर्ण करावे.
भुती नाला व रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
नगर परिषदेमार्फत गटार लाईनसाठी फोडलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून सुरक्षित वाहतुकीसाठी खुले करावेत.
शहरातील अवैध रेती तस्करी तात्काळ बंद करून दोषी अधिकारी, कर्मचारी व वाहनचालकांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी.
या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत प्रशांत डांगे यांनी प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. उपोषणस्थळी नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.
Leave a Comment