ब्रह्मपुरी: शहरातील सिव्हील लाईन, गुजरी वॉर्ड परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली. गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पलाश रमेश कुंभारे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (दारूच्या नशेत घर पेटवले)
मिळालेल्या माहितीनुसार, पलाश हा मागील सात वर्षांपासून गंभीर मानसिक व्याधीने त्रस्त होता. त्याच्या आजारपणामुळे कुटुंबीय देखील चिंतेत होते आणि त्याच्यावर चंद्रपूर तसेच नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून सातत्याने उपचार सुरू होते. बुधवारी रात्री पलाशने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी नेहमीप्रमाणे संवाद साधला होता, त्यामुळे तो इतके टोकाचे पाऊल उचलले असा कोणताही संशय कोणालाही आला नाही. मात्र, गुरुवारी पहाटेच्या सुमारास तो कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडला.
सकाळी उशिरापर्यंत पलाश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, घराजवळील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना काही स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने ही माहिती पलाशच्या कुटुंबीयांना दिली. विहिरीजवळ जाऊन पाहणी केली असता, तो मृतदेह पलाशचाच असल्याचे निष्पन्न झाले. एका तरुण मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे समजताच गुजरी वॉर्ड परिसरात शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सात वर्षांपासून सुरू असलेल्या मानसिक त्रासामुळे आलेल्या नैराश्यातूनच पलाशने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत. एका हसत्याखेळत्या तरुणाचा असा अंत झाल्याने कुंभारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Leave a Comment