चंद्रपूर: 'राजा शिवाजी' चित्रपट करमुक्त करा, CM फडणवीसांना पत्र

May 08, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि पराक्रमाचा जिवंत वारसा मांडणारा 'राजा शिवाजी' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करमुक्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना लेखी पत्र पाठवून जनभावनेचा आदर करण्याची विनंती केली आहे. (चंद्रपुरात अपघाताचे सत्र सुरु)

 

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांचे विचार आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट शिवरायांच्या शौर्याची गाथा अत्यंत प्रभावीपणे मांडतो. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलून त्याला तातडीने करमुक्त घोषित करणे गरजेचे आहे.

 

हा चित्रपट करमुक्त केल्यास तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. यामुळे केवळ शहरांमधीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांनाही आपल्या राजाचा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल. शैक्षणिक दृष्टिकोनातूनही हा चित्रपट मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

 

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या अशा कलाकृतींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. तरी राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन 'राजा शिवाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय त्वरित जाहीर करावा आणि शिवप्रेमींना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Comment

+