चंद्रपूर : जिल्ह्याचा पारा सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून नागरिक उन्हाने होरपळून निघत आहेत. अशा भीषण परिस्थितीतही जिल्ह्यातील काही खासगी शाळा शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरूच असल्याची गंभीर बाब समोर आली होती. शाळेच्या या भूमिकेमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे केल्या होत्या. मुलांचे आरोग्य हीच प्राथमिकता असल्याचे मानून खासदारांनी तातडीने या प्रकरणी जिल्हा महिला काँग्रेसला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. (१२ वी बोर्डाचा निकाल, मुलींची बाजी)
खासदार धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष कुंदाताई जेणेकर यांच्या नेतृत्वात २ मे रोजी एका विशेष आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. महिला कार्यकर्त्यांनी शहरातील विविध खासगी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शाळा व्यवस्थापनाला 'गांधीगिरी' मार्गाने विनंती केली.
चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळू नका आणि वाढत्या तापमानाचा विचार करून तात्काळ उन्हाळी सुट्ट्या जाहीर करा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
महिला काँग्रेसच्या या आक्रमक पण संयमी भूमिकेचा सकारात्मक परिणाम त्वरित दिसून आला. या आंदोलनाची आणि विनंतीची दखल घेत अनेक शाळा प्रशासनांनी नमती भूमिका घेतली आणि ३ मे पासून शाळांना अधिकृत सुट्ट्या जाहीर केल्या. जिल्हा महिला काँग्रेसच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या पालकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला असून, या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वतोपरी असून त्यांना उन्हाचा कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने पार पडलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व कुंदाताई जेणेकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. सुनंदा धोबे, अश्विनी खोब्रागडे, अनुताई दहेगावकर, दीक्षा सातपुते, प्रतिभा पेंदाम आणि पायल दुर्गे यांच्यासह काँग्रेसच्या इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुलांच्या हितासाठी धावून आलेल्या या महिला शक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Comment