चंद्रपूर : महिलांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी खंबीर प्रशासकीय नेतृत्वाची मागणी करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. कुंदा अविनाश जेनेकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. कडक, धडाडीच्या आणि निर्भीड प्रतिमेच्या माजी आयपीएस (IPS) अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, यामुळे महिलांच्या प्रश्नांना आता अधिक प्रभावी आवाज मिळणार आहे. (चंद्रपुरात महिला कांग्रेसची गांधीगिरी)
काही दिवसांपूर्वीच महिला काँग्रेसच्या वतीने अॅड. कुंदा जेनेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. महिला आयोगाचे अध्यक्षपद हे एखाद्या राजकीय व्यक्तीऐवजी आयएएस, आयपीएस किंवा निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. जेणेकरून प्रशासकीय यंत्रणेवर वचक निर्माण होईल आणि पीडित महिलांना निस्पक्षपातीपणे न्याय मिळेल, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. ही नियुक्ती म्हणजे महिलांच्या संघर्षाचा मोठा विजय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या यशाबद्दल बोलताना अॅड. कुंदा जेनेकर म्हणाल्या की, "महिला काँग्रेसने केलेल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार केला आणि एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली, याबद्दल समाधान वाटते. मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील महिलांना अधिक सुरक्षित आणि न्यायपूर्ण वातावरण मिळेल, अशी खात्री आहे." या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
विशेष बाब म्हणजे अद्यापही अशी अधिकृतपणे कुणाचीही निवड महिला आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नाही, DGPIR ने याबाबत वृत्ताचे खंडन केले असून असा कसलाही निर्णय झालेला नाही, सध्या हे पद रिक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Comment