ओयो हॉटेल्स, अवैध दारू, वाळू माफिया: चंद्रपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था कडक करा

May 05, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा याकरिता चंद्रपूर भाजपतर्फे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वाघाच्या जिल्ह्यात पुन्हा आगमन झाल्यानिमित्त भाजपने पोलीस अधीक्षक नोपानी यांचे स्वागत केले. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा बसणार असा विश्वास भाजपने यावेळी दर्शविला. (चंद्रपुरातील ताडोब्यात वाघ किती, आकडेवारी जाहीर)

 

चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शांतता समिती मध्ये बदल झाला नाही, अनेक वर्षांपासून जुने सदस्य यामध्ये कार्यरत आहे, त्यामुळे गेल्या काही काळात अनेक अनुचित घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय शांतता समितीचे पुनर्गठन अत्यंत आवश्यक आहे, सदर समित्यांमध्ये समाजातील प्रामाणिक, निःपक्ष, शांतताप्रिय व प्रतिष्ठित नागरिकांची नियुक्ती करण्यात यावी.

 

चंद्रपुरात अंमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, तरुण वर्गाचे आयुष्य या व्यसनाने उध्वस्त होत आहे, अंमली पदार्थाच्या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण या संपूर्ण नेटवर्कचे सिंडिकेट उध्वस्त करण्यात यावे.

जिल्ह्यात कोळसा चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे, काही ठिकाणी तर शासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संगनमतातून या चोरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, कोल वॉशरी व कोल माफिया वर कारवाई व्हावी याकरिता विशेष पथक स्थापन करण्यात यावे. व पोलिसांची तांत्रिक व गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करावी.

 

जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, यामागील अनेक कारणे आहे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, जड वाहनावरील सुरक्षाविषयक त्रुट्या, वाहतूक नियमांचे उल्लंघन, विनापरवाना वाहन चालविणे, यावर कठोर कारवाई करीत पोलिसांनी तपासण्या मोहीम, कठोर दंडात्मक कारवाई, जनजागृती अभियान आणि नियमित वाहतूक यंत्रणा सक्षम करण्यात याव्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यात यावा, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त बैठक घेत तपासणी मोहीम राबवावी. वाळू तस्करी मध्ये संघटित गुन्हेगारी पुढे आली असून पर्यावरणीय हानीसह कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे, वाळू माफियांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

 

महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसा व इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिला वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, यासाठी पोलीस विभागाने महिला सुरक्षा पथक, हेल्पलाईन, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.

चंद्रपूर शहरात विना परवाना सुरु असलेल्या ओयो हॉटेल्सवर कारवाई करण्यात यावी, निवासी परवान्यांचा गैरवापर करून काही ठिकाणी ओयो चा लॉजिंग व्यवसाय सुरु आहे, याठिकाणी अनैतिक प्रकार सुरु असून सामाजिक वातावरण दूषित होत आहे, विशेष तपासणी मोहीम राबवित संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

 

चंद्रपूर शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेदरम्यान गंभीर घटना घडल्या होत्या, भविष्यात ह्या घटना घडू नये याकरिता पूर्वनियोजन करीत सीसीटीव्ही निरीक्षण, संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व आयोजकांशी समन्व्य बैठक व त्वरित प्रतिसाद यंत्रणा सक्षम करावी. अश्या विविध मागण्यांचे निवेदन चंद्रपूर भाजपतर्फे पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर सह अनेक भाजप पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.   

Leave a Comment

+