चंद्रपूर: राज्यातील वीज ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या 'टाइम ऑफ डे' (टीओडी) सवलत योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, जुलै २०२५ पासून आतापर्यंत राज्यातील ७० लाख ग्राहकांनी एकूण २,२३५ कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवला आहे. सौरऊर्जेसारख्या स्वस्त आणि नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढल्यामुळे महावितरणने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही सवलत लागू केली आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा औद्योगिक क्षेत्राला झाला असून, १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी १,५३४ कोटी रुपयांची सवलत मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्व प्रकारच्या औद्योगिक ग्राहकांचा विचार केल्यास एकूण ४३,९११ ग्राहकांना १,७७४ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. (पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी)
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यात प्रथमच घरगुती ग्राहकांनाही टीओडी सवलतीचा फायदा देण्यास सुरुवात झाली आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांना कोणत्या वेळी किती वीज वापरली गेली याची अचूक माहिती मिळत असल्याने, सुमारे ६९ लाख घरगुती ग्राहकांनी १,०९६ दशलक्ष युनिट वीजवापरासाठी ८९ कोटी रुपयांची बचत केली आहे. सध्या घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरासाठी प्रति युनिट ८५ पैसे सवलत दिली जात आहे. वाणिज्यिक श्रेणीतील ११,०१७ ग्राहकांना २३९ कोटी रुपये, तर सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर सेवांना २०२ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे.
औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी ही सवलत अधिक व्यापक असून, १० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १५ टक्के आणि ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत २५ टक्के इतकी मोठी सवलत दिली जात आहे. राज्यात घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू असल्याने टीओडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. अधिक वीज लागणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरून ग्राहकांनी आपल्या वीज बिलात जास्तीत जास्त बचत करावी, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.
Leave a Comment