मूल (चंद्रपूर): ५ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास मूल तालुका आणि परिसर अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळ व गारांच्या पावसाने हादरून गेला. दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या नैसर्गिक आपत्तीत मूल जवळील राजोली येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, सिमेंट विटांचे शेड अंगावर कोसळल्याने ४५ वर्षीय व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत डोनुजी शेणमारे (वय ४५, रा. राजोली) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कडक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक प्रशांत शेणमारे यांनी राजोली रेल्वे स्टेशन परिसरात स्वतःच्या शेतात सिमेंट विटा बनवण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांनी शेतात सिमेंटच्या विटांचे एक शेड नुकतेच उभारले होते. ५ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि आकाशात ढग जमून गारांचा पाऊस सुरू झाला. वादळाचा वेग प्रचंड असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रशांत यांनी आपल्याच शेतातील त्या शेडचा आसरा घेतला.
परंतु, चक्रीवादळाचा वेग इतका भयानक होता की, नुकतेच बांधलेले ते सिमेंट विटांचे शेड अचानक कोसळले. दुर्दैवाने प्रशांत शेणमारे हे त्या शेडच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच वेदनादायी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगारा बाजूला करून प्रशांत यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतक प्रशांत शेणमारे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा कमावता आधार हिरावल्याने शेणमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण राजोली गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.
याच चक्रीवादळाचा मोठा फटका वाहतुकीलाही बसला आहे. वादळामुळे मूल ते राजोली दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका चारचाकी कारवर अचानक मोठे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने जीवितहानी टळल्याचे समजते. दुपारी ३.३० वाजेपासून रस्त्यावर झाडे पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वृत्त लिहिस्तर प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
Leave a Comment