चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील तुकुम परिसरातील 'मित्रमंडळी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित' (रजि. नं. सी.एच.डी/३५३/२००१) या संस्थेच्या गुंतवणूकदारांसाठी आणि सर्व हितधारकांसाठी दूर्गापूर पोलीस ठाण्याकडून एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या कारभाराबाबत दूर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम (MPID Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३१८(४), ३१६(५) व ३(५) यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. (दारू पाजली आणि गळा आवळला, पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी)
पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान अशी शक्यता समोर आली आहे की, संबंधित संस्था आणि त्यातील काही जबाबदार व्यक्तींनी नागरिकांना विविध गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा केली आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता ठोस पुराव्यांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी या संस्थेत अथवा संबंधित व्यक्तींकडे आपली रक्कम गुंतवली आहे, त्यांनी त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
ज्या गुंतवणूकदारांकडे या व्यवहाराशी संबंधित कोणत्याही गुंतवणुकीच्या पावत्या, अधिकृत करारपत्रे, बँकेच्या व्यवहारांचा तपशील किंवा इतर कोणतीही प्रमाणपत्रे पुरावा म्हणून उपलब्ध असतील, त्यांनी ते कागदपत्रे घेऊन दूर्गापूर पोलीस स्टेशन गाठावे. ही माहिती आणि पुरावे तपास प्रक्रियेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. माहिती देण्यासाठी पुढे येणाऱ्या व्यक्तींची ओळख आणि त्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.
संबंधित नागरिकांनी कार्यालयीन वेळेत दूर्गापूर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ७८८७८९१००३ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ps.durgapur@mahapolice.gov.in या ई-मेल पत्त्यावर देखील पत्रव्यवहार करता येईल. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने सर्व गुंतवणूकदारांनी या सूचनेची तातडीने दखल घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती तपास अधिकारी, दूर्गापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Leave a Comment