चंद्रपूर: कौटुंबिक कलह आणि संशयाचे भूत किती भयानक असू शकते, याचे दाहक वास्तव गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील घटनेतून समोर आले आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६० वर्षीय नराधम पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची अद्दल घडविली आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. प्रकाश कदम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, समाजात गुन्हेगारांवर वचक बसवणारा हा संदेश मानला जात आहे. (चंद्रपूरच्या सीमेवर १०१ ग्राम एमडी पावडर जप्त)
ही हृदयद्रावक घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी मौजा कुडेसावली येथे घडली होती. आरोपी धनपाल माधव रामटेके याने वयाच्या साठाव्या वर्षीही आपल्या पत्नीच्या, वंदना रामटेके यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. याच वादातून त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने वार करून स्वतःच्या पत्नीचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण गोंडपिपरी परिसरात खळबळ उडाली होती. आपल्या आईच्या हत्येनंतर मुलगा अमर रामटेके याने दिलेल्या तक्रारीवरून कोठारी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोठारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी अत्यंत सखोल आणि तांत्रिक पुरावे गोळा करून या प्रकरणाचा तपास केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता श्री आसिफ शेख यांनी सरकार पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि केमिकल अनालायझर रिपोर्ट यांसारख्या सबळ पुराव्यांमुळे आरोपीला पळवाट उरली नाही.
न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अन्वये आरोपी धनपाल रामटेके याला दोषी ठरवून आजीवन कारावास आणि ३,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जर आरोपीने दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. या यशस्वी तपासात सपोनी योगेश खरसान यांच्यासह पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस शिपाई मनीषा गोवर्धन चिवंडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. म्हातारपणात आधार देणाऱ्या जोडीदाराचा असा क्रूर अंत केल्याबद्दल न्यायालयाने आरोपीला कोणतीही दया न दाखवता कडक शासन केले आहे.
Leave a Comment